सोलापूरात क्रोमा शोरूम फोडणारा आंतरराज्यीय सराईत चोर अटकेत : पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल ३६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
सोलापूर शहरातील होटगी रोडवरील टाटा कंपनीच्या 'क्रोमा' शोरुममध्ये झालेल्या मोठ्या चोरीचा छडा लावत, सोलापूर गुन्हे शाखेने एक धक्कादायक उकल केली आहे. तब्बल ४०.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आंतरराज्यीय घरफोड्या टोळीतील एक सराईत आरोपी रामनिवास ऊर्फ रामा मंजू गुप्ता (वय ३७, सध्या रा. दिवा, ठाणे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ६७ महागडे मोबाईल फोन आणि मुद्देमालासह ३६.३३ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर यांच्या तपास पथकाने कौशल्याने केली आहे.
गुन्ह्याचा तपशील :
दिनांक ३० मे २०२५ रोजी, होटगी रोडवरील टाटा कंपनीच्या 'क्रोमा' शोरुममध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने प्रवेश करत, विविध नामांकित कंपन्यांचे (ॲपल, सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, विवो, नथिंग) एकूण ७८ मोबाईल फोन व काळ्या रंगाची शोरुमची सॅक असा ४०,४१,२२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी क्रोमा शोरुमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी (रा. रोहिणी नगर, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३६/२०२५, भा.दं.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही व गुन्हेगाराचा शोध :
सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. पो.आ. इम्रान जमादार यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण केले. तपासाअंती संशयिताची ओळख पटली.
तपास दरम्यान, संबंधित आरोपी रामनिवास ऊर्फ रामा मंजू गुप्ता याच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक दुकानं फोडण्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सोलापुरात रेल्वे स्टेशन परिसरातून अटक :
दिनांक ३ जून २०२५ रोजी, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी रामनिवास गुप्ता याला सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून संशयास्पद हालचाली करताना अटक करण्यात आली. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता तो चोरीचे मोबाईल फोन विकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी त्याच्याकडून ६७ मोबाईल फोन, एक काळी सॅक आणि त्याचा वापरत असलेला मोबाईल फोन मिळून एकूण ३६,३३,८२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या पथकाने उघडकीस आणला गुन्हा :
या कारवाईमध्ये सपोनि शैलेश खेडकर, सपोनि विजय पाटील, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, आबा सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, इब्राहिम शेख, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, शैलेश बुगड, चालक सतीश काटे, शाम सुरवसे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.
पोलीस आयुक्तांची प्रशंसा :
या तपासाचे पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी कौतुक करत तपास पथकाचे अभिनंदन केले.ही यशस्वी कामगिरी म्हणजे सोलापूर पोलिसांची तांत्रिक क्षमतांवरील पकड, गुन्हेगारांविरुद्धचा कटाक्ष आणि अविरत मेहनतीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

0 Comments