कारसह तीन लाखांची दारू पकडली मंद्रूप पोलिसांची दमदार कारवाई.
सोलापूर / प्रतिनिधी
तेरामैल ते माळकवठा रोड वरून जाणाऱ्या कारमधून (एमएच ०६/बीई ००९१) एक लाख ५२ हजार रुपयांची अवैधरीत्या दारू मंद्रूप पोलिसांनी पकडली आहे. पोलिसांनी वाहन चालक मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ (वय ३५, रा. माळकवठा, ता. दक्षिण सोलापूर) याला नोटीस देऊन सोडले आहे.दोन लाखांच्या कारमध्ये दीड लाख रुपयांचे विदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स घालून मेहबूब नदाफ सोलापुरात येत होता. खबऱ्याकडून पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंद्रूप शहरातील कत्री चौकात सापळा लावला. काहीवेळाने ती कार त्याठिकाणी आली. पोलिसांनी कार अडविली. गाडीची झडती घेतली, त्यावेळी कारमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. कार व दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास यामावार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक मसलखांब, भोसले, सुतार, काळे, शेख यांच्या पथकाने पार पाडली.

0 Comments