बार्शी तालुक्यात कुसळंब गावात तब्बल १०७ शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटर चोरी.
बार्शी, तालुक्यातील कुसळंब गावात एकाच रात्री तब्बल १०७ शेतकऱ्यांच्या विहिरींतील पाणबुडी मोटारी आणि केबल्स चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे. दि.२६ जून रोजी सायंकाळी ६ वा. पासून ते २७ जून सकाळी ७ वा. पर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कुसळंब येथील शेतकरी संजय तुकाराम ठोंगे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेतातील गट नंबर ३८४ मधील विहिरीतून ५ एचपी CRI कंपनीची पाणबुडी मोटार आणि २० मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरली. या मालमत्तेचे एकूण मूल्य १०,१०० रुपये आहे. संजय यांनी २६ जून रोजी सायंकाळी शेतातील सिताफळ बागेला पाणी देऊन घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीवर गेल्यावर मोटार आणि केबल गायब असल्याचे आढळले. पाईप आणि रस्सी कापलेली, तसेच बोर्डाशी जोडलेली केबलही गायब होती. संजय यांनी शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना समजले की, गावातील आणखी १०६ शेतकऱ्यांच्या विहिरींमधूनही ५ एचपी आणि ७.५ एचपीच्या पाणबुडी मोटारी आणि केबल्स चोरीला गेल्या आहेत. यामध्ये नागनाथ धोंडीबा ठोंगे, विकी शिवाजी ठोंगे, वसंत दगडू ठोंगे, अक्षय हरीभाऊ उकिरंडे, नंदा अनिल शिंदे, दिगंबर चक्रधर काशीद आणि शंकुतला कालिदास काशीद यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपापल्या मालमत्तेची चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात २७ जून रोजी रात्री ९:४७ वाजता फिर्यादी संजय ठोंगे यांनी लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले की, अज्ञात चोरट्यांनी मुद्दाम आणि लबाडीने त्यांच्या आणि इतर शेतकऱ्यांच्या मालमत्तेची चोरी केली.पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, आसपासच्या परिसरात चौकशी सुरु आहे. तसेच, चोरीच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत आहे.
%20(5).jpeg)
0 Comments