हिसका मारून दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांना अटक,शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसका मारून चोरणाऱ्या दोघां आंतरजिल्हा गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांकडून १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.हणमंत रामचंद्र बोडके (वय २२, रा. पाथरूड, जयवंत नगर, धाराशिव सध्या रा. आण्णाभाऊ साठे नगर, धाराशिव) आणि नागेश उर्फ नागनाथ दऱ्याप्पा पाटोळे (वय २३, रा. निंरकार कॉलनी, प्लॉट नं. ४७, संजय नगर, सांगली सध्या रा. सचिन लगदिव यांच्या घरी भाड्याने, गणेश नगर. धाराशिव) हे अटकेत आहेत. १५ एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान रेखा सिध्देश्वर बिजली (वय ३३, रा. मंत्री चंडक नगर) या त्यांच्या शेजारच्या महिलांसोबत रूपाभवानी मंदीर येथे देवदर्शन करून परत घराकडे जात असताना दिप हॉस्पीटलजवळ अनोळखी व्यक्तीने रेखा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेऊन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून पळ काढला होता. याबाबत जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. दीप हॉस्पीटलजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणाची तपासणी करून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी २ मे रोजी चोरीचे दागिने विकण्यासाठी रूपाभवानी मार्गे सराफ बाजारात येणाऱ्या दोघां संशयितांना पाणी गिरणी गेटसमोरील रस्त्यावर पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हणमंत बोडके व नागेश पाटोळे यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी, सोन्याचे गंठण, मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस आयुक्त एम राजकुमार , उपायुक्त डॉ. दिपाली काळे, सहायक आयुक्त राजन माने, पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, अमंलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, सायबर पोलिस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली.

0 Comments