Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूरात तलवारधारीचा धुमाकूळ; गुन्हे शाखेची झटपट कारवाई, आरोपी जेरबंद

 

सोलापूरात तलवारधारीचा धुमाकूळ; गुन्हे शाखेची झटपट कारवाई, आरोपी जेरबंद

सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या इसमास शहर गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत जेरबंद केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस आयुक्तालयाकडून अवैध शस्त्रांच्या वापरावर कठोर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर शहर गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. ०४ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टॅण्ड क्रमांक ०२ समोर एक इसम तलवार घेऊन आरडाओरड करत नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहे.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे संबंधित इसम हातात लोखंडी तलवार घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमाची ओळख मोहन नागनाथ पोतु (वय ३७, रा. शास्त्रीनगर) अशी पटली. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २ फूट लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स.पो.नि. शंकर धायगुडे यांच्यासह अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजू वाघमारे आणि अभिजीत धायगुडे यांनी सहभाग घेतला.

 ( विशेष)

शहरात वाढत्या अवैध शस्त्रप्रकरणांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments